धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए के मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते डॉ.मारुती लोंढे यांनी  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलताना वरील प्रतिपादन केले. ते म्हणाले की, अण्णाभाऊचां जीवनाचा प्रवास हा सोपा नव्हता. अनेक खडतर रस्त्यांनी हा प्रवास सुरू झाला होता, लहानपणी दलित म्हणून प्रस्थापित समाकडुन मिळालेली हेटाळणी पदोपदी संघर्षाचे वादळ मनात निर्माण करत होती,आणि हेच वादळ त्यांनी आपल्या लेखणीतून व्यक्त केले. त्यांनी जे साहित्य लिहिले ते केवळ कपोलकल्पित नव्हते तर त्यात संघर्षाची धग होती. याच धगीने मराठी मातीला, मराठी माणसाला या व्यवस्थेला जागे केले.अण्णाभाऊ एक चालते बोलते जिवंत विद्यापीठ होते जीवनाच्या शाळेतुन घेतलेले हे शिक्षण क्रांतीचे शिक्षण होते. अण्णाभाऊंनी 37 कादंबऱ्या,19 कथासंग्रह अनेक पोवाडे लिहीले. आयुष्याचा पहिला गुरु म्हणजे भूक असलेल्या व्यक्तीमत्वा कडुन निर्माण झालेल्या या साहित्यात रस्त्यावरचे नायक होते.  शेतकरी होते, गिरणी कामगार होते. अण्णाभाऊंच्या साहित्याने आणि शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला उर्जा दिली. त्यांच्या साहित्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आणि भारता बाहेरील भाषेमध्ये देखील त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले. हे त्यांचेच नव्हे तर मराठी मुलखाचे दैदिप्यमान यश होते 18 जुलै 1969 रोजी या शब्द योद्ध्याचा अंत झाला. माणूस मरतो पण विचार मरत नाहीत,आज जागतिक स्तरावर जगातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्याचे संशोधन होत आहे. हे मराठी भाषेकरीता मराठी माणसाकरिता मोठे यश आहे असे अनमोल विचार डॉ लोंढे यांनी मांडले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर म्हणाले की अण्णाभाऊंच्या साहित्याचा मुख्य केंद्र बिंदू भूक हाच आहे आणि हिंदी साहित्यातील प्रमुख लेखक प्रेमचंद यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू देखील भूक हाच आहे. मराठी मूलखासाठी झगडणारी त्यांची लेखणी ही क्रांतीकारी लेखणी आहे जीवनातील अनेक संकटांवर मात करून पुढे जाण्याचे बळ त्यांचे साहित्य देते. समाज परीवर्तन एका रात्रीत होत नसते, यासाठी अण्णाभाऊंनी खूप खस्ता खाल्ल्या, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला एक वेगळी प्रकाशमय वाट त्यांनी दाखवून दिली. हा वास्तविक इतिहास आहे. सामान्य माणसाचे नेतृत्व करणारे अण्णाभाऊ साठे हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते. आधुनिक समाजाने या मोठ्या उंचिच्या माणसाचे साहित्य वाचावे जेणेकरून मातीतून माणसं कशी उगवतात याचा उलगडा माणसाला होईल असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

यावेळी डॉ.सी आर दापके,प्रा केशव क्षीरसागर,प्रा समीर शेख,प्रा माधव उगिले यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बालाजी गुंड यांनी केले आहे. सदरप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल डॉ मदनसिंग गोलवाल यांच्या पुढाकाराने लेखन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.ए.के मंजुळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा.पी. टी. घुगे यांनी मानले.

 
Top