भूम (प्रतिनिधी)- ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर जयंतीनिमित्त भूम शहरात श्रद्धा, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात भव्य जुलूस काढण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शांतता, प्रेम, दया, बंधुता आणि मानवतेच्या शिकवणीचा संदेश देत काढण्यात आलेल्या या जुलूसाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेहंतीशाह वली दर्गापासून जुलूसाला प्रारंभ करण्यात आला.
शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक व भागांमधून ही मिरवणूक मार्गक्रमण करीत पुन्हा मेहंतीशाह वली दर्गा परिसरात परतली. तेथे धार्मिक वातावरणात जुलूसाची सांगता करण्यात आली. जुलूसात लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह विविध समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान विविध भागांमध्ये विविध राजकीय पक्ष, आघाड्या, सामाजिक संघटना, जनशक्ती शहर विकास आघाडीचे नगरसेवक तसेच नागरिकांच्या वतीने सहभागींचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी जुलूसात सहभागी झालेल्या बालगोपाळांसह नागरिकांना खाऊ, दूध व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. सेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांमुळे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. या भव्य जुलूसाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘मस्जिद शेख जैद अलकबीर'ची भव्य आणि देखणी कलाकृती. पांढऱ्या रंगातील आकर्षक मस्जिद, उंच मिनार, सुंदर घुमट आणि नाजूक कलाकुसरीमुळे हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी या कलाकृतीचे मोठ्या उत्साहाने कौतुक केले. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या जुलूसातून एकता, शांतता, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश शहरभर पोहोचला. पैगंबरांच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी परस्पर प्रेमाने व बंधुभावाने राहावे, हाच संदेश या जुलूसातून देण्यात आला. जुलूस यशस्वी करण्यासाठी भूम शहर जुलूस कमिटीने परिश्रम घेतले.
