धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग साधत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ऐतिहासिक नागनाथ मंदिर परिसरात पंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यटन विकास समिती,सकल वीरशैव लिंगायत समाज, धाराशिव सेवक फाऊंडेशन व राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रूढी-परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महिलांसाठी पारंपरिक झोक्याचे विशेष नियोजन करण्यात आले होते.नागनाथ मंदिर परिसरातील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर महिला भगिनींनी झोका घेत आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आलेल्या पर्यटकांना केळी, चिप्स,पाणी व खीरचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी साधना जानराव,शिवाजी अनंतवाड व योगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.पाहुण्यांचे स्वागत शाल व पर्यटन स्थळांची माहिती प्रसिद्धी पत्रक देऊन केले. त्यांच्या व उपस्थितीतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,उपाध्यक्ष गणेश वाघमारे,प्रा.अभिमान हंगरगेकर,सहसचिव अब्दुल लतीफ,कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग, रविंद्र शिंदे,दयानंद पोळ,सदस्य वर्षा नळे,साधना वाघमारे,श्रीमती पोळ,रेश्मा घरबुडवे,आम्रपाली सोलापुरे, अमृता वाघमारे,अनोखी परी,विहान, विहास धाराशिव सेवक फाऊंडेशनचे विवेक यादव, प्रकाश चव्हाण,ओम शुक्ला, राजर्षी शाहू संस्थेच्या अध्यक्षा उज्वला शिंदे, सचिव रमेश पाटील,सदस्य ज्योती राजेनिंबाळकर यांच्यासह सकल वीरशैव लिंगायत समाजातील महेश रामचंद्र उपासे, महारुद्र पिसे,अमर मैराण, दयानंद नागापुरे, पांडुरंग भोकरे, सिद्धेश्वर बेलुरे, सोमनाथ बेलुरे, सिद्धाराम तुगावकर,गिरीश पाळणे, बसवेश्वर पाळणे,वैजनाथ गुळवे, गोपाळ केसकर, दीपक नाईक, पुजारी माणिक चव्हाण, अशोक वाघमारे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज नळे यांनी केले, तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले. पारंपरिक संस्कृती,निसर्ग संवर्धन आणि पर्यटन जनजागृती यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा पंचमी महोत्सव पर्यटक व उपस्थित महिलांसाठी विशेष आकर्षण ठरला.
