धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदनवन, मुंबई येथे वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश करत पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वैराग नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधींनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे वैराग परिसरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, आगामी काळात वैराग व परिसरातील जनतेच्या विकासाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यास या संघटनात्मक विस्ताराचा निश्चितच फायदा होणार आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सातत्याने मजबूत होत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व, विकासाची भूमिका आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची कार्यपद्धती यामुळे शिवसेनेच्या विचारांशी जोडले जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे.
वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा हा प्रवेश स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, यामुळे वैराग परिसरात शिवसेनेला मोठे संघटनात्मक बळ मिळाले आहे. आगामी काळात नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामे, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रतीक रोचकरी यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. युवा नेतृत्व म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक रोचकरी यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या युवा संघटनेलाही वैराग व परिसरात मोठे बळ मिळणार आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, “वैराग नगरपंचायतीतील नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच प्रतीक रोचकरी आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करू.”
“हा केवळ पक्षप्रवेश नसून वैराग परिसराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी एकत्र येण्याची नवी सुरुवात आहे. येणाऱ्या काळात वैराग परिसरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या प्रश्नासाठी शिवसेना ताकदीने उभी राहील,” असा विश्वासही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना पक्षात सुजाता संगमेश्वर डोळसे नगराध्यक्षा, निरंजन प्रकाश भुमकर उपनगराध्यक्ष, अजयकुमार शिवाजी काळोखे नगरसेवक, अक्षय विठ्ठल ताटे नगरसेवक, जयश्री खंडेराया घोडके नगरसेविका, अतुल अशोक मोहिते नगरसेवक, नागनाथ नामदेव वाघ नगरसेवक,. तृप्ती निरंजन भुमकर नगरसेविका, अनुप्रिया आनंद घोटकर नगरसेविका, गुरुबाई संजय झाडमुखे नगरसेविका, आसमा नयुम मिर्झा नगरसेविका, पद्मिन आप्पाराव सुरवसे नगरसेविका, जैतुनबी गफूर बागवान नगरसेविका, सविता विनायक खंदाड नगरसेविका, रहेमून अकबर शेख नगरसेविका, प्रतीक रोचकरी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रवेश केला.
वैराग नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधी आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची वैराग परिसरातील संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवसेना परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि असंख्य कार्यकर्त्यांचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मनःपूर्वक स्वागत केले.
