वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 च्या कलम 27 अन्वये वाटप करण्यात आलेल्या सिलींग जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे वाशी तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 4 मे 2026 रोजीच्या राजपत्रामध्ये महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग-2 चे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2026 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नियमांनुसार सिलींग जमिनींच्या धारणाधिकाराचे वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत आहे.

याबाबत अपर जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी पत्र क्र. 2026/सा.प्र./भू.सू.2/कावी-1096, दिनांक 21 मे 2026 अन्वये संबंधित जमिनींच्या रूपांतरणासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 च्या कलम 27 अन्वये ज्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 धारणाधिकारावर वाटप करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये वाटपानंतर हस्तांतरण न झालेल्या किंवा जमिनीच्या वापरामध्ये कोणताही बदल न झालेल्या जमिनींचा समावेश आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने हस्तांतरित करण्यात आलेल्या अथवा वापरामध्ये बदल झालेल्या जमिनींचाही नियमानुसार विचार करण्यात येणार आहे.

अशा जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करताना शासनास देय असलेले अधिमूल्य (नजराणा) संबंधित जमिनीच्या वापराखालील क्षेत्राच्या प्रमाणात तसेच त्या वापरास लागू असलेल्या शासन निर्धारित अधिमूल्याच्या दरानुसार आकारण्यात येणार आहे.

वर्ग-2 जमिनींच्या हस्तांतरणावर असलेल्या निर्बंधांमुळे संबंधित जमीनधारकांना अनेक प्रशासकीय बाबींमध्ये अडचणी येत असतात. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार पात्र जमीनधारकांना आपला धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करून घेता येणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची कागदपत्रे व आवश्यक माहितीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

वाशी तालुक्यातील कलम 27 अन्वये सिलींगमध्ये वाटप झालेल्या जमिनीचे धारक असलेल्या शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पात्र जमीनधारकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय, वाशी येथे सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी केले आहे.

 
Top