धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील बांधकाम क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणारे अभियंता शिवकुमार गिरी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोसावी समाज प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवकुमार गिरी यांचे शिक्षण पुणे येथे झाले असून, शिक्षणानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात आपल्या कार्याची सुरुवात केली. तांत्रिक ज्ञान, कौशल्य, उत्कृष्ट नियोजन आणि दर्जेदार बांधकाम यामुळे त्यांनी धाराशिव शहरात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली. धाराशिव शहराच्या विकासातही शिवकुमार गिरी यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली शहरात उत्कृष्ट मॉल, हॉस्पिटल तसेच विविध अपार्टमेंट प्रकल्पांचे बांधकाम करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार साहित्य, आकर्षक बांधकाम आणि योग्य नियोजन यामुळे त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक झाले आहे.

बांधकाम क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोसावी समाज प्रतिष्ठानने त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली. लातूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवकुमार गिरी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदाच्या प्रसंगी त्यांचे आई-वडील राजाभाऊ विश्वनाथ गिरी आणि सौ. उत्तरा राजाभाऊ गिरी हे विशेष उपस्थित होते. आपल्या मुलाच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव होत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

शिवकुमार गिरी यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कार्याची पोचपावती असून, या सन्मानामुळे धाराशिव शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल समाजबांधव, मित्रपरिवार, सहकारी, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर तसेच धाराशिव शहरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही शिवकुमार गिरी यांनी बांधकाम क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून दर्जेदार व आधुनिक प्रकल्प उभारावेत आणि आपल्या कार्यातून धाराशिव शहराचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.


 
Top