धाराशिव (प्रतिनिधी)- शिर्डी येथून देवदर्शन करून कुटुंबासह परतणाऱ्या भाविकांच्या कारवर तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावरील गंधोरा पाटीजवळ मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात 21 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे चार अज्ञात दरोडेखोरांनी कारची काच फोडून चाकू, लोखंडी रॉड व पाईपचा धाक दाखवत कुटुंबीयांना मारहाण केली आणि सोन्याच्या दागिन्यांसह 64 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेमुळे उशिरा प्रवास करणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
काजल संदीप पवार या आपल्या कुटुंबासह शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन कलबुर्गीकडे जात होत्या. 20 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास त्यांची गाडी तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावरील गंधोरा पाटीजवळ आली असता, दबा धरून बसलेल्या चार अज्ञात इसमांनी गाडी अडवली.
दरोडेखोरांनी वाहनाची काच फोडून आत प्रवेश करत लोखंडी रॉड, पाईप आणि चाकूचा धाक दाखवला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केली आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.
या प्रकारानंतर फिर्यादी काजल पवार यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून 21 ऑगस्ट 2026 रोजी अज्ञात चार दरोडेखोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता () कलम 309(6) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महामार्गावर दहशत निर्माण करणाऱ्या या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.