‌


धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद धाराशिवच्या स्थायी सभागृहात ‌‘आपला जीव  धाराशिव, व्हिजन 2030' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या आढावा बैठकीस मित्राचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवंदा महाडदळकर यांची प्रमुख उपस्थिती होते.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‌‘आपला जीव  धाराशिव, व्हिजन 2030' या संकल्पनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध उद्दिष्टांबाबत उपस्थित अधिकारी व विभागप्रमुखांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विभागाने निश्चित केलेली उद्दिष्टे केवळ कागदोपत्री न ठेवता ती प्रत्यक्ष गावपातळीवर प्रभावीपणे राबवून त्याचा ठोस परिणाम नागरिकांच्या जीवनात दिसून यावा, यासाठी नियोजनबद्ध व परिणामाभिमुख पद्धतीने काम करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले.  प्रत्येक विभागासाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे, त्यांची सद्यस्थिती आणि पुढील कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्दिष्टपूर्तीसाठी संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

'सायंकाळी 7 ते 9 मोबाईल बंद' या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे 1,080 शाळा आणि 92 हजार विद्यार्थी यांच्यापर्यंत हा उपक्रम प्रभावीपणे पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकारी, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन तपासणी करून, दररोज 10 ते 12 शाळांना भेटी देऊन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे खातेप्रमुख, विभागप्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


गावागावात सायरनच्या माध्यमातून तसेच दवंडी देऊन नागरिकांमध्ये उपक्रमाबाबत जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक गावात उपक्रमाची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसिद्धी, प्रेझेंटेशन व सादरीकरण करण्यावरही भर देण्यात आला. ‌‘आपला जीव  धाराशिव' अंतर्गत 13 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक गावाला उद्दिष्ट देऊन वृक्षलागवड व त्यानंतरचे संवर्धन प्रभावीपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय प्रत्येक घरावर सोलार ऊर्जा वापरास प्रोत्साहन, कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक तरतूद, विद्युत दाहिनी, सार्वजनिक वाचनालये, मोबाईल व्हॅन तसेच क्षयरोग निर्मूलन यांसारख्या विविध उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांच्या खातेप्रमुखांना या उपक्रमांसाठी आवश्यक नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने आवश्यक माहिती व एक महिन्याचा डेटा एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रभावी प्रचार-प्रसार करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा प्रभावी व उत्पन्नवर्धक वापर करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद इमारती व गाळ्यांसाठी प्लॅनिंग व मास्टर प्लॅन तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तुळजापूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार करणे तसेच जिल्हा परिषदेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून गाळे भाडेतत्त्वावर देणे, त्यासाठी संबंधितांकडून अथवा ठेकेदाराकडून आवश्यक डिपॉझिट घेणे आदी बाबींवरही चर्चा करण्यात आली.

‌‘आपला जीव  धाराशिव, व्हिजन 2030' अंतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. खातेप्रमुख व विभागप्रमुखांनी आपल्या विभागाच्या उद्दिष्टांचा नियमित आढावा घेऊन क्षेत्रीय स्तरावर त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या. ‌‘आपला जीव  धाराशिव, व्हिजन 2030' ही केवळ एक योजना नसून धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारी व्यापक संकल्पना असून, तिच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात सकारात्मक व दृश्यमान बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन आमदार मा. श्री. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले.

 
Top