भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी भूम येथील सहकारी दूध संघ पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प ) जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन होत असतानाही दूध उत्पादकांना योग्य बाजारपेठ, स्थिर दर, नियमित दूध संकलन आणि प्रक्रिया सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांना आपले दूध खासगी दूध संकलकांना कमी दराने विकावे लागत असून त्याचा आर्थिक फटका बसत आहे.
भूम येथे सहकारी तत्त्वावर दूध संघ पुन्हा कार्यान्वित झाल्यास परिसरातील दूध उत्पादकांकडून नियमित व पारदर्शक पद्धतीने दूध संकलन करता येईल. तसेच दूध शीतकरण, प्रक्रिया, पॅकिंग व विपणनाची व्यवस्था निर्माण करून उत्पादकांना त्यांच्या दुधाला योग्य व स्थिर दर मिळवून देण्यास मदत होईल. भूम येथील दूध संघाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक निधी, पायाभूत सुविधा, दूध संकलन केंद्रे, शीतकरण व्यवस्था आणि तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत ठोस कृती आराखडा तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
