वाशी (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्यांची जाणीव, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने शिवाजी ज्ञानविहार शिक्षण मंडळ संचलित अंकुरम विद्यामंदिर, वाशी येथे शैक्षणिक वर्ष 202627 साठी विद्यार्थी परिषदेची निवडणूक व पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान करून आपल्या प्रतिनिधींची निवड केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

विद्यार्थी परिषदेच्या 12 पदांसाठी तब्बल 51 विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविली. प्रचार, मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडली. निवडून आलेल्या 12 विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ घेतली. यावेळी विविध समिती प्रमुखांनीही आपल्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करत शाळेतील शिस्त, स्वच्छता, सांस्कृतिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. सर्व पदाधिकारी व समिती प्रमुखांनी सामूहिक शपथ घेत प्रामाणिकपणा, सचोटी, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेने कार्य करण्याची ग्वाही दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संघभावना आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी उपस्थितांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक राजेश आवटे, मुख्याध्यापक डॉ. एम. शिवनाथन, श्री. आतकरे, श्री. भराटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


 
Top