तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांनी तुळजापूर शहर तसेच श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातून रूट मार्च काढला. रूट मार्चनंतर वरिष्ठ पोलीस व प्रशासनिक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांचे स्वागत करून त्यांना मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर मनोहर पाटील, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, तुळजापूर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, मंदिर चौकीचे पोलीस निरीक्षक येवते तसेच  सुरक्षा अधिकारी प्रदीप पाटील, सहायक सुरक्षा अधिकारी रुपेश देशमुख, मंदिर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर, ऋषभ रेहपांडे यांच्यासह पोलीस, मंदिर प्रशासन आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांचे स्वागत करून सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. भाविकांशी सौजन्याने वागावे आणि भाविकाभिमुख दृष्टिकोन ठेवून कर्तव्य बजावावे, अशा सूचना दिल्या. सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तीला थारा देऊ नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भाविकांमध्ये सुरक्षा यंत्रणेबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे, असे नमूद केले. भाविकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवून त्यांना सुरक्षिततेचा विश्वास देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक येवते यांनीही मार्गदर्शन केले.


116 अधिकारी-जवानांचे सुरक्षा कवच

श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एकूण 116 अधिकारी व सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 6 अधिकारी असून, त्यापैकी 1 पोलीस निरीक्षक, 4 पोलीस उपनिरीक्षक आणि 1 सहायक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. या पथकात काही महिला अधिकारी व सुरक्षा जवानांचाही समावेश आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांच्या तैनातीमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, गर्दी नियंत्रण, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे.


 
Top