भूम (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, रजिस्टर व इतर आवश्यक शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी विद्या विकास मंडळाचे सहसचिव तथा शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. प्रा. गंगाधर काळे यांनी अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून शिक्षणाची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. राम सोळंके, क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी, प्रा. चंद्रकांत शिंदे, प्रा. धनश्री पिंपरे, प्रा. दिपाली चव्हाण आणि प्रा. बालाजी माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसह पालकांनीही स्वागतार्ह असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
