धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १९९९ मध्ये याच महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले तीन माजी विद्यार्थी पास झाल्यानंतर २७ वर्षांनी कॉलेजमध्ये आले होते.

यावेळी सेमीकंडक्टर इंडिया येथे प्रकल्प व्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजर) म्हणून कार्यरत असलेले श्री. आशिष कुमार शर्मा, कॅपजेमिनी मुंबई येथे प्रकल्प सल्लागार (प्रोजेक्ट कन्सल्टंट) असलेले श्री. गिरीशकुमार हेगडे तसेच अमेरिकेत स्थायिक झालेले व अमेरिकन एक्सप्रेस येथे संचालक (डायरेक्टर) म्हणून कार्यरत असलेले श्री. राजेश कुमार या तिघांनी महाविद्यालयास भेट दिली. या प्रसंगी त्यांनी आपल्या कॉलेजमधील विद्यार्थीदशेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या माजी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (इटीसी) विभागाच्या व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली. तसेच भारतात व परदेशात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींविषयी मार्गदर्शन केले.

 गिरीशकुमार हेगडे यांनी आजच्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांना नवनवीन करिअर संधींची माहिती दिली. तर श्री. राजेश कुमार यांनी भारतात व भारताबाहेर उपलब्ध असलेल्या रोजगार संधींविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती दिली. श्री. आशिष कुमार शर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आजचा ट्रेंडिंग विषय असलेल्या सेमीकंडक्टरबद्दल उपयुक्त माहिती देऊन या क्षेत्रात मिळू शकणाऱ्या विविध संधी सांगितल्या.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी आपल्या महाविद्यालयाचे जवळपास दहा हजाराहून अधिक विद्यार्थी भारतात व परदेशात मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च तंत्रावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्यातच आज हे माजी विद्यार्थी आवर्जून कॉलेजला भेट देण्यासाठी आले आहेत त्या बद्दल आभार  मानून विद्यार्थ्यांनी यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालय व माजी विद्यार्थी सातत्याने मदत करत असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इटीसी विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय करून दिला. या तज्ज्ञ व्याख्यानासाठी इटीसी विभागातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. वर्षा बोंदर यांनी सर्वांचे आभार मानले.

सत्रानंतर विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधत नवीन तंत्रज्ञान, उद्योगातील ट्रेंड व परदेशातील नोकरीसंधी यांची सखोल माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top