धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय कामकाज करताना शिक्षकांना येत असलेल्या अडचणींना शिक्षक दरबारात वाचा फुटू शकते अशी भावना शिक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. वेतन पथकाने जी.पी.एफ.रक्कामांच्या नोंदी करून पावत्या द्याव्यात. शिक्षण अधिकारी कार्यालयात आलेले प्रस्ताव एक आठवड्यात निकाली काढावेत. वैद्यकीय देयके तात्काळ मंजूर करावीत. शिक्षक हे सहनशील असतात म्हणून त्यांच्यावर अशैक्षणिक कामे लादू नये, असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले.
ते जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृह धाराशिव येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हा धाराशिवच्यावतीने आमदार विक्रम काळे यांनी भरवलेल्या शिक्षक दरबारात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद कृषी सभापती भाऊसाहेब खरसडे, जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.रवींद्र खंदारे, माध्यमिक वेतन पथक अधीक्षक कैलास पिकवणे, प्राथमिक अधीक्षक दिनकर होळकर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, सामाजिक न्याय भवनचे सहाय्यक आयुक्त अमोल ताकभाते, नगर परिषद प्रशासन अधिकारी नईम शेख, आर.डी.सुळ, प्रा.अंकुश नाडे, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती.
फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मध्ये 100% गुण घेणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थी व त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस राजकुमार मेंढेकर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार तुळजापूर तालुकाध्यक्ष सुहास वडणे यांनी मानले.
