धाराशिव (प्रतिनिधी)- कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठीच्या ‘पॉश' कायदा 2013 मधील तरतुदी तसेच सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली यांच्या आदेशांची अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही,याची राज्यातील शासकीय व खासगी कार्यालये, संस्था,कंपन्या आणि त्यांच्या शाखांची तपासणी महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू आहे. जून 2026 पासून राज्यभरात चार हजारांहून अधिक तपासणी अधिकाऱ्यांकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
राज्यात आतापर्यंत 3,579 शासकीय आणि 3,296 खासगी कंपन्या व कार्यालयांची,अशा एकूण 6,875 ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे.त्यापैकी पॉश कायद्यातील तरतुदींची पूर्तता न केल्याचे आढळून आल्याने 294 शासकीय आणि 378 खासगी कार्यालयांना,अशा एकूण 672 कार्यालयांना जिल्हास्तरावरून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नोटीस बजावलेल्या कार्यालयांनी विहित मुदतीत आवश्यक पूर्तता न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार 50 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची कारवाई संबंधित जिल्हा अधिकारी (पॉश ॲक्ट -2013) आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.
धाराशिवमध्ये 119 कार्यालयांची तपासणी
जिल्ह्यातही पॉश कायद्याच्या अंमलबजावणीची तपासणी सुरू असून आतापर्यंत 69 शासकीय आणि 50 खासगी कंपन्या व कार्यालयांची तपासणी करण्यात आली आहे.तपासणीदरम्यान आवश्यक पूर्तता न केल्याचे आढळून आल्याने 35 शासकीय आणि 54 खासगी कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
‘SHE BOX पोर्टलवर नोंदणी बंधनकारक
जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालये,संस्था,कंपन्या तसेच त्यांच्या शाखांनी पॉश कायदा 2013 मधील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक कार्यवाही करणे बंधनकारक आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या ‘ SHE BOX ' पोर्टलवर कार्यालयाची नोंदणी, अंतर्गत समितीची स्थापना व नोंदणी,समितीचे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण,वार्षिक अहवाल आदी बाबींचा समावेश आहे.संबंधित कार्यालयांनी व संस्थांनी या पोर्टलवरील आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणेही बंधनकारक आहे.
तपासणीदरम्यान वरील बाबींची पूर्तता केली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यालये,संस्था व कंपन्यांवर पॉश कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल,असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे संपर्क साधावा,असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांनी केले आहे.