तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावणमासानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूर येथील खडकाळ गल्ली परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, शिवलीलामृत पारायण तसेच श्रीमद्‌‍ देवी भागवत कथा सोहळ्याला मंगळवारी (दि. 25) सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली. धार्मिक वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 51 महिला व पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्माचा जागर सुरू असतानाच रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने या सोहळ्याचे विशेष कौतुक होत आहे. ‌‘सेवा हीच साधना' या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


100 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

याच कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे तसेच विविध आजारांची प्राथमिक तपासणी करता यावी, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासोबत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


रक्तदात्यांना जार, पंख्यांची भेट

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रक्तदात्यांना जार व पंखे भेट देण्यात आले. रक्तदानासाठी पुढाकार घेणाऱ्या महिला-पुरुषांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांनी हा उपक्रम राबविला. तसेच ग्रंथवाचकांना साड्या धोतरी या सोहळ्यात भेट देण्यात आले 


धार्मिक सोहळ्याला सामाजिक उपक्रमाची जोड

श्रावणमासानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, शिवलीलामृत पारायण आणि श्रीमद्‌‍ देवी भागवत कथा यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रक्तदान आणि आरोग्य तपासणीसारख्या उपक्रमांमुळे धार्मिक सोहळ्याला सामाजिक सेवेची जोड मिळाली आहे. त्यामुळे यंदाचा हरिनाम सप्ताह केवळ अध्यात्मिक कार्यक्रम न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा संदेश देणारा सोहळा ठरला आहे. या कार्यक्रमास ह.भ.प. पांडुरंगरेड्डी महाराज,  किशोर कदम, नगरसेवक सुनील रोचकरी यांच्यासह रणसम्राट कबड्डी संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

 
Top