तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या पंचक्रोशीत सिंदफळ येथे स्थित असलेल्या श्री मुद्गलेश्वर शंभू महादेव मंदिरात द्वितीय श्रावण सोमवार भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री मुद्गलेश्वर महादेवांची वराह अवतार पूजा विशेष धार्मिक विधीपूर्वक मांडण्यात आली. पूजा मांडल्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली.

द्वितीय श्रावण सोमवार असल्याने श्री शंभू मुद्गलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. ‌‘हर हर महादेव', ‌‘शंभो महादेव'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी भक्तिभावाने श्री मुद्गलेश्वरांचे दर्शन घेत पूजाअर्चा केली. श्रावणातील प्रत्येक सोमवारी श्री मुद्गलेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक विधींसह विशेष पूजा मांडण्यात येते. त्यामुळे श्रावणातील सोमवारी या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह दूरवरून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात.

‌‘इच्छा हराची जग हे विशाल ।

पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ ।'

या भक्तिभावपूर्ण वातावरणात महाआरतीनंतर भाविकांना श्री मुद्गलेश्वरांचे दर्शन घेता आले. श्रावण महिन्यात मंदिरात सुरू असलेल्या या विशेष पूजांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

‌‘उमापती भैरव विघ्नहारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥'

 
Top