धाराशिव  (प्रतिनिधी)-  नाशिक-अहमदनगर-अक्कलकोट-सुरत-चेन्नई महामार्गासाठी जिल्ह्यातील परंडा व तुळजापूर तालुक्यांतील 31 गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत 481.39 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. अद्याप 63.96 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन शिल्लक आहे.11 ऑगस्ट 2026 अखेरच्या भूसंपादन सद्यस्थितीनुसार ही माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील 20 गावांतील आणि तुळजापूर तालुक्यातील 11 गावांतील,अशा एकूण 31 गावांतील 545.35 हेक्टर क्षेत्र संपादित करावयाचे आहे.या महामार्गाची धाराशिव जिल्ह्यातील एकूण रस्त्याची लांबी 81.20 किलोमीटर आहे. परंडा तालुक्यातील 20 गावांमध्ये एकूण 33 निवाडे करण्यात आले असून,त्यामध्ये 20 मूळ व 13 अतिरिक्त निवाड्यांचा समावेश आहे.तुळजापूर तालुक्यातील 11 गावांमध्ये एकूण 20 निवाडे झाले असून, त्यात 11 मूळ व 9 अतिरिक्त निवाड्यांचा समावेश आहे.अशा एकूण 53 निवाड्यांनुसार 481.39 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.त्यामुळे संपादित करावयाच्या एकूण क्षेत्रापैकी 63.96 हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे.

या निवाड्यांनुसार एकूण 1,794 शेतकरी भूसंपादनाच्या प्रक्रियेत आहेत. यामध्ये परंडा तालुक्यातील 1,128 तर तुळजापूर तालुक्यातील 666 शेतकऱ्यांचा समावेश आहे. निवाड्यांनुसार एकूण 257.36 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 212 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. यापैकी आतापर्यंत 100 कोटी रुपये प्राप्त झाले असून,112 कोटी रुपये अप्राप्त आहेत. ही अप्राप्त रक्कम भूमिराशी पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्राप्त झालेल्या 100 कोटी रुपयांपैकी आतापर्यंत 68.74 कोटी रुपयांची रक्कम मोबदला म्हणून वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे प्राप्त रकमेतून 31.26 कोटी रुपये शिल्लक आहेत.आतापर्यंत 359 शेतकऱ्यांना मोबदला वाटप करण्यात आला असून, त्यासाठी 68.74 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महामार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर क्षेत्र संपादित झाले असून, उर्वरित 63.96 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन, तसेच पात्र भूधारकांना मोबदला वितरणाची कार्यवाही पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे.

 
Top