तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री खुलेआम सुरू असल्याची चर्चा असतानाच तुळजापूर पोलिसांनी मंदिर परिसरातील वाघमारे गल्ली येथे छापा टाकून विक्रीसाठी जवळ बाळगलेला तब्बल 24 हजार 421 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा विक्रीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कि संजय बाबुराव गलांडे (वय 55, रा. समर्थ नगर, तुळजापूर) यांच्याकडे दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वाघमारे गल्लीतील माउली पान शॉपच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तत्सम पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान केसरयुक्त पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, बादशाह गुटखा, व्ही-1 टोबॅको, गोवा-1000, के.आर. शॉट 999 चुइंग टोबॅको आदी प्रतिबंधित पदार्थ पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम 30(2)(अ), शिक्षापात्र कलम 59 आणि नमूद अन्य कलमांनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच ठिकाणी कारवाई; बाकी ठिकाणी काय?
दरम्यान, तुळजापुरातील विविध भागांत प्रतिबंधित गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी केवळ एकाच ठिकाणी केलेल्या कारवाईमुळे ‘बाकी ठिकाणांवर कारवाई कधी?' असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तीर्थक्षेत्राची ओळख असलेल्या तुळजापुरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री होत असेल तर त्यावर कठोर अंकुश आणण्याची गरज असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.