तुळजापूर (प्रतिनिधी)- घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कथित कारवाईप्रकरणी सिंदगाव (ता. तुळजापूर) येथील सरपंचांना मोठा दिलासा मिळाला आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मे. विशेष न्यायालय, धाराशिव यांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

नळदुर्ग पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 405/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील कलम 7(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच मागितल्याचा आरोप सरपंचांवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. आरोपीतर्फे नियमित जामीन अर्ज दाखल करून बचाव पक्षाने न्यायालयासमोर विविध कायदेशीर मुद्दे मांडले. सरपंचांनी स्वतःच्या कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी केली नसून, संबंधित घरकुलाचा हप्ता देण्याचे काम त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचा सांगुन तसेच, गावामध्ये घेण्यात आलेल्या दारूबंदीच्या ठरावाचा राग मनात धरून तक्रारदाराने संगनमताने खोटी तक्रार करून सरपंचांना या प्रकरणात अडकविल्याचा दावा   ॲड एम बी माढेकर यांनी बचाव पक्षाकडून करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मे. विशेष न्यायाधीश, धाराशिव यांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात अर्जदार बचाव पक्षातर्फे ॲड. एम. बी. माढेकर, ॲड. धर्मराज सरडे आणि ॲड. व्ही. एम. बारकुल यांनी काम पाहिले.


 
Top