धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब धाराशिवच्या सामाजिक, सेवाभावी, पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत लातूर येथे पार पडलेल्या अवार्ड सेरेमनी मध्ये क्लबला विविध मानाचे 12 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अध्यक्ष रणजीत रणदिवे आणि सचिव प्रदीप खामकर यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना या पुरस्कारांच्या माध्यमातून विशेष दाद मिळाली.
क्लबला बेस्ट टेक्नोसॅव्ही क्लब अवॉर्ड, बेस्ट फेलोशिप क्लब अवॉर्ड, बेस्ट वॉटर मॅनेजमेंट अवॉर्ड, बेस्ट क्लब एक्सलन्स अवॉर्ड, डीजी गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड, इकॉनॉमी अँड कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड, आउटस्टँडिंग प्रोजेक्ट अवॉर्ड आणि आउटस्टँडिंग पब्लिक इमेज अवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे बेस्ट सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट फर्स्ट रँक अवॉर्ड मिळवत सचिव प्रदीप खामकर यांनी उत्कृष्ट कार्याची छाप उमटवली. तसेच बेस्ट प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट अवॉर्ड मिळवत अध्यक्ष रणजीत रणदिवे यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला.
क्लबने वर्षभरात सामाजिक बांधिलकी जपत जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, समुदाय सेवा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, जनजागृती, मैत्री व फेलोशिप तसेच समाजोपयोगी विविध प्रकल्प राबविले. या उपक्रमांना मिळालेली ही पुरस्कारांची पावती म्हणजे क्लबच्या कार्याची दखल असल्याची भावना रोटरी सदस्यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल अध्यक्ष रणजीत रणदिवे व सचिव प्रदीप खामकर यांच्यासह सर्व रोटरी सदस्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन होत आहे. “हा सन्मान केवळ पुरस्कार नसून पुढील काळात अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा आहे,” अशी भावना क्लबचे अध्यक्ष रणजीत रणदिवे वतीने व्यक्त करण्यात आली.
