धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांचा कर्ज खात्यामध्ये 5029कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतीच थेट ऑनलाईन हस्तांतरित करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातील 12 हजार 214  पात्र शेतकऱ्यांचा समावेश झाला असून त्यांच्या कर्ज खात्यात 105 कोटी 86 लाख 54 हजार 704 रुपये  जमा करण्यात आली  असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी दिली आहे.  कोळगे यांनी म्हटले आहे की, शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी म्हटले की,  राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती बाबत दिलेल्या आश्वासनाची टप्प्या - टप्प्याने अमंलबजावनी  सुरू केली आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्यातील सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे कर्जमुक्ती नंतर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून ही शेतीच्या हंगामातील गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक असलेली आधार प्रमाणीकरण  केवायसी तसेच बँक खात्याची पडताळणी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. संबंधित प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास लाभ मिळण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक असलेली कागदपत्रे व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी. त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांची यादी महाराष्ट्र सरकारच्या महा आयटीने संबंधित बँकेच्या  पोर्टलवर अपलोड केली आहे.  तसेच  विविध कार्यकारी  सोसायटी , ग्रामपंचायती संबंधित बँक शाखेत ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यास एक विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला असून पहिल्या टप्प्यात नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी निराश न होता उर्वरित पात्र शेतकऱ्यांची नावे पुढील टप्प्यांमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याचे कोळगे यांनी म्हटले आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top