धाराशिव (प्रतिनिधी)-  कर्जाच्या ओझ्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026 अंतर्गत जिल्ह्यातील 12 हजार 224 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर तब्बल 105 कोटी 86 लाख 54 हजार 704 रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला असून,आगामी खरीप हंगामासाठी नव्या पीक कर्जाचा मार्गही मोकळा झाला आहे.

या योजनेत राज्यभरातील 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 5 हजार 28 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात आली.दरम्यान,पहिल्या प्रसिद्ध यादीतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. योजनेतील कर्जमुक्ती व एकवेळ समझोता या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,12 राष्ट्रीयीकृत बँका व इतर खाजगी बँका अशा एकूण 52 बँकांनी सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती महा- आयटीमार्फत विकसित पोर्टलवर अपलोड केली.त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 97 हजार 873 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 5 हजार 28 कोटी 70 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील 12 हजार 214 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 105 कोटी 86 लाख 54 हजार 704 रुपये जमा झाले असून, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2 हजार 218 शेतकऱ्यांना 14 कोटी 86 लाख 22 हजार 119 रुपयांचा लाभ मिळाला आहे.

 
Top