धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड , धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात 52 नामांकित कंपन्यांमार्फत तब्बल 329 विविध पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार असून, पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
या मेळाव्यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पदविका, पदवी, अभियांत्रिकी पदवी, विज्ञान शाखेतील पदवी, वाणिज्य शाखेतील पदवी, समाजकार्य पदव्युत्तर पदवी आणि व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी आदी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
तसेच माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी, वित्त, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक्स, विद्युत, रसायन, कृषी आणि उत्पादन उद्योग यांसह विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी सहभागी व्हावे
शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या शोधात असलेल्या तसेच आपल्या कौशल्याला योग्य संधी मिळण्याची अपेक्षा असलेल्या युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, परिचयपत्र (बायोडाटा) व इतर आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे. “एक मुलाखत तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते,” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र आणि इच्छुक युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आणि जिल्हा रोजगार उपायुक्त संजय गुरव यांनी केले आहे.