तुळजापूर (प्रतिनिधी)- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले असुन . नवरात्रोत्सवातील विविध पूर्वतयारी आणि सोयी-सुविधांसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्याची मागणी नगरपरिषद तुळजापूर यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. मागील थकबाकीसह आगामी उत्सवासाठी तब्बल 30 कोटी 23 लाख 67 हजार रुपयांचा वाढीव निधी मंजूर करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तुळजापूर नगरपरिषदेला शासनाकडून दरवर्षी अवघे 3 कोटी 75 लाख रुपये वार्षिक अनुदान मंजूर केले जाते. मात्र, प्रत्यक्ष यात्रेच्या काळात होणारा प्रचंड खर्च पाहता ही रक्कम म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे' अशीच ठरत आहे. सन 2019 चा यात्रेचा निधी अद्याप मिळालाच नाही. 2020 आणि 2021 मध्येही प्रशासनाला तुटपुंजा निधी देवून बोळवण करण्यात आली. 2023, 2024 आणि 2025 या वर्षांत प्रत्यक्ष खर्चाचा आकडा मंजूर अनुदानाच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला. अनुदानापेक्षा जास्त खर्चाची कामे झाल्याने कंत्राटदारांची देयके थकली आहेत. नगरपरिषदेच्या स्वतःच्या फंडातून हा अथांग खर्च भागवणे अशक्य झाले असून कंत्राटदारांची देयके अदा करताना प्रशासनाची पुरती नाकेबंदी झाली आहे.
आगामी शारदीय नवरात्र उत्सव 2026 साठी एकट्या नगरपरिषदेला तब्बल 10 कोटी रूपयांचा अंदाजीत खर्च अपेक्षित आहे. मागील थकीत रक्कम आणि आगामी उत्सवाचा खर्च मिळून एकूण 30 कोटी 24 लाख रुपये शासनाकडून तातडीने उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
दरवर्षी लाखो भाविक तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात. शासनाकडून कोट्यवधींच्या घोषणा केल्या जातात. मग प्रत्यक्षात उत्सवाच्या तोंडावर नगरपरिषदेला निधीसाठी झोळी पसरवण्याची वेळ का येते? पालकमंत्र्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करून हा निधी मंजूर करावा. अन्यथा यात्रेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्यास त्याची जबाबदारी शासन घेणार का? असा सवाल आता केला जात आहे.