धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात समितीच्या वतीने नमूद करण्यात आले की, इंजिनियरिंग पदवी परीक्षेकरिता महाराष्ट्र शासनाची MHT --  CET 2026 परीक्षा पार पडलेली आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच शिक्षक पालक व विद्यार्थ्यांचे सदरच्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या गैरव्यवहारामुळे प्रामाणिक अभ्यासू व गरीब विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे. अशा प्रकारचे घोटाळे करून पैशाच्या बळावर अकार्यक्षम विद्यार्थी कार्यक्षम विद्यार्थ्यांच्या जागा बळकावत आहेत. अशा घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत आणि हे लोकशाहीच्या शिक्षण प्रणालीसाठी खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून या घटनेची सक्षम प्राधिकरणा मार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने सनदशीर कायदेशीर लढा उभारण्यात येईल याची शासन प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे सचिव आकाश भोसले, कार्याध्यक्ष अमोल साळुंके, तालुकाध्यक्ष बबलू भोईटे, शहर उपाध्यक्ष अविनाश रणखांब, शहर सचिव रामानंद माडेकर, तालुका संघटक सचिन उमाप, रवी शितोळे,  अमोल पवार,  हनुमंत तांबे, सचिन पाटील,कायदेशीर सल्लागार ओंकार शितोळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top