भूम (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त संजय गाढवे मित्र परिवाराच्या वतीने 28 जुलै रोजी भूम शहरातील साहील कॉम्प्लेक्स येथे गुरुजनांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात भूम नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता गाढवे व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते उपस्थित गुरुजनांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गुरुजनांच्या कार्याचा गौरव करताना विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अनमोल असून समाज घडविण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मान्यवरांनी सांगितले. या प्रसंगी ॲड. सुंदरराव हुंबे, उषा विर्धे, केशव जगदाळे, आंबादास देशपांडे, प्रभाकर शेटे, महावीर भोपलकर, किरण जाधव, आलीम शेख, त्र्यंबक गाढवे, सुमित्रा माळी, सूरज गाढवे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाजात सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढी घडत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला सलाम केला.
