उमरगा (प्रतिनिधी)- समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, रोटरी ही केवळ मैत्रीची नव्हे तर मानवसेवेची चळवळ आहे. समाजहिताच्या कार्यात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढला तर मोठे परिवर्तन घडू शकते, असे प्रतिपादन रोटरीचे भावी प्रांतपाल सतीश लोणीकर यांनी केले.

उमरगा रोटरी क्लबच्या सन 2026-27 या वर्षातील नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे होते.

यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी  परीक्षांच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि पालक मानसिक तणावाखाली असल्याचे सांगत, अशा काळात समुपदेशन व योग्य मार्गदर्शनाची गरज अधिक असल्याचे नमूद केले. रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमांना आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माजी प्रांतपाल डॉ. दीपक पोफळे यांनी रोटरीने नेहमीच समाजातील गरजू व उपेक्षित घटकांसाठी कार्य केले असून, ही सेवा भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहील, असे सांगितले. तसेच दैनंदिन जीवनातील धकाधकीत आनंदी राहण्याचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.

या वेळी उमरगा रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अनिल मदनसुरे तर सचिवपदी शिवशंकर व्हंडरे यांनी पदभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष अनिल मदनसुरे यांनी नविन कार्यकारीणी जाहीर केली. आपल्या कार्यकाळात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास सहाय्यक प्रांतपाल दिनेश पटेल, डॉ. मल्लीनाथ मलंग, माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी नगरसेवक विवेक हराळकर, ॲड. प्रवीण तोतला, बाबू स्वामी, प्रशांत कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, डॉ. सुचेता पोफळे, कमलाकर भोसले, डॉ. निलेश महामुनी, डॉ. राजकुमार कानडे, प्रदीप चालुक्य, शमीम पठाण, अमर परळकर, मनीष सोनी, प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. विनोद देवरकर, कलशेट्टी पाटील, शिवकुमार दळवी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष धनंजय मेनकुदळे यांनी केले. सूत्रसंचालन संजय ढोणे व परमेश्वर सुतार यांनी केले, तर आभार प्रदर्शन नूतन सचिव शिवशंकर व्हंडरे यांनी केले.

 
Top