भूम (प्रतिनिधी)- श्री संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दि. 17 जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी गावात पहिले गोलरिंगण भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
खंडेश्वर वाडी येथील गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केले. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी पाथरूड आंबी, उंडेगाव, कुकडगाव या भागातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भूम तालुक्यातील दांडेगाव येथील मुक्काम उरकून परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांची पालखी दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पालखीचे विसाव्याच्या ठिकाणी आगमन झाले.त्यानंतर पहिल्यांदा वारकरी ,विणेकरी, टाळकरी, पालखी सोबत आलेले दोन आश्वाचे रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी विसाव्याच्या ठिकाणी आलोट गर्दी दिसून आली .यानंतर दुपारचे भोजन खंडेश्वरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन ही करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले .भगवंत ब्लड बँक बार्शी यांचे सहकार्य लाभले.आबी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

