धाराशिव - धाराशिव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत 22 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय ऐनवेळीचे चार ते पाच विषयही सभेपुढे मांडण्यात आले.
शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रस्तावांवर चर्चा झाली असून जिजाऊ उद्यानाचे सुशोभीकरण, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील विकासकामे, नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्ट्रीट लाईट आणि अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना सभेत प्राधान्य देण्यात आले. सभेत जिजाऊ उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा झाली. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत धाराशिव शहरासाठी मंजूर झालेल्या विकासकामांना ना हरकत देऊन ती तातडीने सुरू करण्याबाबतही निर्णय प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील इंदिरानगर येथे पार्किंगसाठी आरक्षित जागेवर आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव सभेत चर्चिला गेला. या इमारतीच्या तळमजल्यात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी सुविधा वाढण्याबरोबरच पार्किंगचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक नाना घाडगे यांनी उजनी धरणाच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची मागणी केली. तसेच समतानगर येथील नगरपालिकेच्या 11 क्रमांकाच्या शाळेची इमारत जीर्ण झाली असून, ती पाडून त्याठिकाणी नवीन शाळा इमारत उभारावी, अशी मागणी त्यांनी सभेत केली. कचरा डेपोच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारकडून निधी उपलब्ध नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे ही समस्या कायम राहिली आहे.
