भूम (प्रतिनिधी)-  ब्राह्मण महासंघ, शाखा भूम यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत 'खारीचा वाटा' या उपक्रमांतर्गत भूम येथील सौ. राणी ताराराजा कन्या प्रशालेतील होतकरू व गरजू विद्यार्थिनींना वह्या व पेनचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून समाजाप्रती उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

यावेळी श्री गुरुदत्त योग मंदिराचे अध्यक्ष अंबादास देशपांडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, पालक आपल्या शिक्षणासाठी मोठ्या कष्टाने खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीने सातत्यपूर्ण अभ्यास करून परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करावे. शिक्षकांचे प्रामाणिक मार्गदर्शन, विद्यार्थिनींचा नियमित अभ्यास, उच्च यशाचे ध्येय आणि जिद्द यांची योग्य सांगड घातल्यास भूम तालुक्याचा स्वतंत्र शैक्षणिक पॅटर्न निर्माण होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमात मराठवाडा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष विलासराव शाळू तसेच प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका उषाताई विर्धे यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी भूम तालुका ब्राह्मण संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, श्रीपाद देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोषराव कुलकर्णी यांनी ब्राह्मण महासंघ, शाखा भूम यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानले.


 
Top