भूम (प्रतिनिधी)- आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल होत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “विठ्ठल... विठ्ठल...“ या नामघोषात सुरू असलेल्या वारीत यंदा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्याच्या कुंथलगिरी परिसरातील खव्याचीही गोड चव वारकऱ्यांना चाखायला मिळणार आहे.
भूम एमआयडीसीतील खवा क्लस्टरमधून पंढरपूर येथे पेढे तयार करण्यासाठी तब्बल दहा टन खवा पाठविण्यात आला आहे. मागील आठवड्यामध्ये चार टन खवा पाठवण्यात आला असून या आठवड्यामध्ये चार आषाढीच्या अगोदर दोन टन अशाप्रकारे पेढे तयार करण्यासाठी भूम येथून दहा टन खवा पंढरपूर मध्ये जात असल्याची माहिती. खवा उत्पादक विनोद जोगदंड यांनी ही माहिती दिली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात खव्याच्या मागण्या आल्याने गेल्या आठवडाभरापासून खवा निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भूम तालुक्यातील कुंतलगिरी परिसर हा खवा आणि पेढा उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात खवा पंढरपूरला पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याने उत्पादकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. या खव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो सौरऊर्जेच्या साहाय्याने आणि आधुनिक यंत्रणेद्वारे तयार केला जातो. त्यामुळे कमी मनुष्यबळात दर्जेदार व स्वच्छ खवा उत्पादन शक्य होत असून, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतीलाही चालना मिळत आहे. यंदाच्या आषाढी वारीत विठुरायाच्या दर्शनासोबतच धाराशिवच्या कुंथलगिरी खव्याची गोडीही लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर राहणार आहे.
वारीसाठी पंढरपूर येथे पेढे बनवण्यासाठी भूम तालुक्यातील कुंथलगिरी चा प्रसिद्ध खवा जात आहे. इतर राज्यातून येणारा भेसळयुक्त खवा व पेढा मा. आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेबांच्या कारवाईमुळे बंद झाल्याने भूम येथील ओरिजनल असणाऱ्या कुंथलगिरीच्या खव्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
विनोद जोगदंड
चेअरमन खवा क्लस्टर भूम.
खवा क्लस्टर भूम येथून आम्ही पेढे बनवण्यासाठी घेतलेला खवा इंडक्शन मशीन वरती बनवलेला खवा हायजेनिक, स्वच्छ व पारंपारिक खवा भट्टी सारखी चव असणारा आहे त्यामुळे आमच्या पेढ्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
एकनाथ लाड पेढेवाले पंढरपूर.
