भूम (प्रतिनिधी)- आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे शनिवारी (दि. 18) सायं. 6. 15  वाजता परंडा येथे आगमन झाले असता नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जि.प. माजी सभापती दत्ता साळुंके, तहसीलदार निलेश काकडे, मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, विशाल देवकर तसेच शिवसेना (ठाकरे) धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील , विश्वजीत पाटील, सुभाष शिंदे, पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले,मोहन देशमुख ,मुकंद देशमुख आदींनी स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी वरुणराजानेही हजेरी लावली होती.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. विविध ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.शहरातील नागरिक, विविध सेवाभावी संस्था,गणेश मंडळ, व्यापारी, राजकीय पदाधिकारी आदींनी वारकरी यांच्यासाठी नाष्टा, चहा,पाणी तसेच भोजनाची व्यवस्था केली होती . ठिकठिकाणी भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .पालखी पाटील गल्लीत मोहन देशमुख व मुकंद देशमुख यांच्या निवासस्थानी मुक्कामी विसावली. या ठिकाणी पूजा, आरती,भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले.श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे नेतृत्व रघुनाथ नारायनबुवा पालखीवाले हे करत असुन पालखी सोहळ्यास 421 वर्षांची परंपरा असून पालखी सोबत 27 दिंड्या तर 21 हजार वारकरी आहेत. पिण्याच्या पाण्याचे  टँकर, रुग्णवाहिका तसेच पोलीस बंदोबस्त होता.

 
Top