धाराशिव (प्रतिनिधी)- अ मराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात सहज,प्रभावी आणि आत्मीयतेने मराठी भाषा वापरता यावी,यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 'महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा' या उपक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे मंगळवारी (दि. 7 जुलै) व्यावहारिक मराठी भाषा शिकविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग,राज्य मराठी विकास संस्था,कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत वाहनचालकांना मराठी भाषेचे सामाजिक,सांस्कृतिक आणि व्यावहारिक महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.त्यांनी ग्राहकांशी सुसंवाद साधण्यासाठी,प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा सन्मान राखण्यासाठी मराठी भाषेचा वापर अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ.ज्योती ठाकरे,माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ तथा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागार यांनी प्रशिक्षणातून चालकांना दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरणाऱ्या मराठी भाषेचे धडे दिले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,प्रा.डॉ.हर्षला, प्रा.लिखिते,प्राचार्य आनंद विश्व गुरुकुल विद्यालय अँड.सुयश प्रधान,तसेच प्राचार्य आनंद गुरुकुल कॉलेज ऑफ लॉ यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक अनिल खेमनर यांनी केले.
