धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला आणखी वेग देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात एमएसआयडीसीने घेतला आहे. भातांब्रा-धाराशिव-सारोळा-शिवली-बोरफळ या रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे धाराशिव शहर व परिसरातील अनेक प्रलंबित विकासकामे प्रत्यक्षात त्यामुळे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
या सुधारित आराखड्यामुळे धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि भविष्यातील वाढत्या गरजांना पूरक होणार आहे. शहरातील जिजाऊ चौक ते सांजा चौकच्या पुढे सुमारे 990 मीटरपर्यंत चारपदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. त्यानंतर आणखी 1.67 कि.मी. अंतरापर्यंत चौपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच सांजा गाव परिसरात 600 मीटर आणि सारोळा गाव परिसरात 750 मीटर अतिरिक्त चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जिजाऊ चौक ते सांजा चौकदरम्यान 4.244 कि.मी. लांबीची आरसीसी बंदिस्त गटारे आणि पदपथ उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना सुरक्षित सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच शहराचा दर्जाही उंचावणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
याशिवाय एमएसईबी उपकेंद्र ते सांजा चौक या मार्गावर 360 मीटर स्मार्ट स्ट्रीट विकसित करण्यात येणार आहे. या परिसराचे आधुनिक स्वरूपात सुशोभीकरण केले जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी उपयुक्त सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, पाइप कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि इतर पूरक कामांचाही या सुधारित आराखड्यात समावेश आहे.
