धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शासनाची आवश्यक परवानगी न घेता काही खाजगी प्राथमिक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.या शाळा शासनमान्य नसल्याने पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा शाळांमध्ये घेऊ नये,असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. रविंद्र खंदारे यांनी केले आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार,जिल्ह्यातील खालील पाच शाळा शासनाची परवानगी न घेता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
राजे विजयसिंह पब्लिक स्कूल, भूम,ता.भूम,जि.धाराशिव, गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल, संभाजीनगर,मुरूम,ता. उमरगा,जि.धाराशि, डॉ.रामानुजन ई-लर्निंग स्कूल, उमरगा,ता.उमरगा,जि. धाराशिव, पोदार इंटरनॅशनल स्कूल, नळदुर्ग,ता.तुळजापूर,जि. धाराशिव, नारायणा ई-टेक्नो स्कूल धाराशिव,ता.व जि.धाराशिव
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की,शासनाची परवानगी नसलेल्या अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची अधिकृत मान्यता आहे की नाही,याची खात्री करूनच निर्णय घ्यावा.
दरम्यान,शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या या अनाधिकृत शाळा बंद करण्यासाठी संबंधित शाळांचे व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम,2009 मधील नियम 18 च्या पोटनियम (5) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.या तरतुदीनुसार संबंधित व्यवस्थापनावर रुपये 1 लाखांचा दंड तसेच शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिन रुपये 10 हजारांचा अतिरिक्त दंड ठोठावण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
अनधिकृत शाळांविरोधातील ही कारवाई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार आणि शासनमान्य शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचेही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. रविंद्र खंदारे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पालकांनी केवळ शासनमान्यता प्राप्त शाळांमध्येच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित ठेवावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.