भूम, (प्रतिनिधी)-  भूम पंचायत समिती कार्यालयाच्या आस्थापना विभागातील कार्यालयाच्या छतावरील स्लॅबचा काही भाग 21 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हीच घटना कार्यालयीन वेळेत घडली असती, तर अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिकांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती.

घटनेनंतर पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीची अवस्था चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. इमारतीतील अनेक विभागांच्या छताला मोठे तडे गेले असून काही ठिकाणी स्लॅबमधील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने भिंतींमध्येही ओलावा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भूम पंचायत समितीची स्थापना 1965 साली झाली असून, त्याच काळात उभारण्यात आलेल्या इमारतीत आजही कार्यालयाचा कारभार सुरू आहे. ही इमारत सुमारे 50 ते 60 वर्षे जुनी असल्याचे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दीर्घकाळ देखभालीअभावी तसेच सततच्या पावसामुळे इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत असल्याची चर्चा आहे.


 
Top