भूम, (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील बाणगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन थांबण्याचे नाव घेत नसून, वाळू माफियांनी पुन्हा एकदा महसूल प्रशासनाला आव्हान दिल्याचे समोर आले आहे. चिंचपूर (ढगे) येथे काही दिवसांपूर्वी अवैधरित्या साठवून ठेवलेला वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता शेजारील बेलगाव येथेही नदीपात्राच्या कडेला अवैधरित्या साठवून ठेवलेला अंदाजे 6 ते 7 ब्रास वाळूचा साठा महसूल विभागाने जप्त केला आहे.
भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) आणि बेलगाव परिसरात बाणगंगा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याची चर्चा असून, वाळू माफियांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार नदीपात्रात उत्खनन करून वाळूचा साठा विविध ठिकाणी करून ठेवला जात असल्याने पर्यावरणासह महसूलाचेही मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाला बेलगाव येथे नदीपात्रालगत अवैधरित्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बेलगावच्या ग्राम महसूल अधिकारी जया सुतार आणि चिंचपूर येथील ग्राम महसूल अधिकारी एस. के. खोत यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली. त्यांनी अंदाजे सहा ते सात ब्रास वाळूचा साठा जप्त करून पंचनामा केला.
