तुळजापूर (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीने मराठवाड्यातील प्रवास पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने प्रस्थान केले. मराठवाड्यातील अखेरचा मुक्काम तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 17) पहाटे भाविकांच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात पालखी तामलवाडीमार्गे सोलापूर जिल्ह्याकडे रवाना झाली.
गुरुवारी (दि. 16) दुपारी पालखीचे तुळजापूर नगरीत आगमन होताच नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेविका प्रियाताई गंगणे, माजी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, नगरसेवक लखन पेंदे, नरेश काका आमृतराव, आनंद सावंत, दिनेश आण्णा क्षीरसागर, आमर हंगरगेकर, नगरसेविका निता क्षीरसागर यांच्यासह नगर अभियंता अतुल तोंडारे, चांगदेव ढोले, बापूसाहेब रोचकरी, बालाजी कोळी, प्रशांत चव्हाण, विश्वास मोटे, बालाजी जाधव, लेखापाल शरयू पाटील, पुष्पांजली मंगरुळे, संज्योत सावंत तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवारी पहाटे पालखीतील पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर घाटशिळ घाटातून हरिनामाच्या अखंड गजरात पालखीने सांगवी काटेसुरतगाव मार्गे तामलवाडीकडे प्रस्थान केले. तामलवाडीहून पालखी पुढील प्रवासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे रवाना झाली. श्री संत गजानन महाराजांची पालखी बरोबरच प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र भक्ती व आनंदाचे वातावरण तालुक्यात निर्माण झाले होते.
