धाराशिव (प्रतिनिधी)- आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा आरोग्य विभागाने व्यापक नियोजन पूर्ण केले आहे.12 जुलै 2026 पासून जिल्ह्यातून विविध पालख्या मार्गक्रमण करणार असून वारकऱ्यांना सुरक्षित,तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन्ही प्रकारच्या सेवांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
यंदाच्या वारीत श्री गजानन महाराज, शेगाव,श्रीमंत एकनाथ महाराज, पैठण,श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कोंडण्यापूर (विदर्भ) तसेच श्री क्षेत्र मुक्ताईनगर पालखी सोहळा या प्रमुख पालख्या धाराशिव जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहेत. जिल्ह्यातील विविध मार्गांवर एकूण 17 पालखी मुक्कामस्थळे असून या सर्व ठिकाणी आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वंकष नियोजन केले आहे.
पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे तसेच पालखी मार्गावरील शासकीय संस्थांमार्फत स्थिर आणि फिरती आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.आरोग्यदूतांच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गावर प्रथमोपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक औषधसाठ्यासह प्रथमोपचार पथके कार्यरत राहतील. जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, हॉटेल, ढाबे तसेच इतर सर्व पाणी स्रोतांची तपासणी आणि पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी हे नियोजन आणि सनियंत्रणाची जबाबदारी सांभाळणार आहेत.