धाराशिव (प्रतिनिधी)-   राज्यात वारंवार घडणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटीच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

लाखो विद्यार्थी आणि शिक्षक वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षांची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीसारख्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीची पायमल्ली होत असून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरत आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना घडणे हे शासनाच्या अपयशाचे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी करून या गैरप्रकारामागील मुख्य सूत्रधारांसह संबंधित सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता जपण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत आणि पेपरफोडीच्या रॅकेटचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणीही डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली.

 
Top