धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की,स्वराज्याशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही, स्वातंत्र्य ही प्रत्येक भारतीयाची मूलभूत गरज आहे ही बाब लक्षात घ्यावी.त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन केले. केसरी, मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जहाल विचारांची अभिव्यक्ती केली. समाजास एकत्रीत आणण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम सुरू केले. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्याची भावना त्यांनी देशाला दिली. गीतारहस्य या ग्रंथातुन कर्मयोगाचा संदेश दिला त्यांनी आपल्या आयुष्यात कर्तव्यनिष्ठ कर्माला प्राधान्य दिले असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ दत्तात्रय साखरे हे यावेळी म्हणाले की,राष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपली की देश सुरक्षित होत असतो. लोकमान्य टिळकांनी समाजाची एक वज्रमूठ तयार केली. राष्ट्रीय शिक्षणाला त्यांनी आयुष्यभर महत्त्व दिले. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा या सामाजिक विषयांवर त्यांनी विशेष लक्ष दिल्याचे प्रतिपादन डॉ साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा माधव उगिले यांनी केले. तर आभार प्रा. पी. टी. घुगे यांनी मानले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
