धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या महाळंगी येथील श्री महालक्ष्मी देवीचा आषाढ पाणी यात्रा महोत्सव बुधवार, दि. 5 ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरा होणार आहे. यात्रा महोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवीभक्त, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साळुंके व महाळंगी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाळंगी येथे श्री महालक्ष्मी देवीची दरवर्षी मोठी आषाढ पाणी यात्रा भरते. प्रशांत साळुंके यांच्या शेतात मशागतीचे काम करत असताना महालक्ष्मी देवीची मूर्ती आढळून आली. त्यानंतर देवीच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करुन भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. संततीप्राप्तीसाठी देखील इथे हजारो भाविक नवस बोलतात. संततीप्राप्तीनंतर दांपत्य येथे नवसपूर्तीसाठी यात्राकाळात मोठ्या संख्येने येतात, अशी माहिती देवीभक्त प्रशांत साळुंके यांनी यावेळी दिली.
यावर्षीही यात्रेनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी देवींची मूर्ती व पालखीचे पूजन, त्यानंतर मानकरी भारत ढवळे यांच्या निवासस्थानापासून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान होईल. पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर भाविकांचे नवसपूर्ती व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
यात्रोत्सवात पोतराज कृष्णा गायकवाड, आशिष थोरात, कृष्णा भडकवाड, पांडू दाडे व इतर पोतराज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. देवीच्या यात्रेत महाळंगी गावासह चिखली, कामेगाव, बोरगाव, रूईभर, बरमगाव, आंबेवाडी, बेंबळीसह परिसरातील इतर गावांमधून हजारो भाविक दरवर्षी श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवात दर्शनासाठी येतात. यावर्षी देखील यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांनी यात्रेतील धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन साळुंके यांनी केले आहे.
