भूम (प्रतिनिधी)- भूम शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'तेरणा जनसेवा केंद्र'चे उद्घाटन युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या केंद्राच्या माध्यमातून तेरणा हॉस्पिटल, नेरुळ (नवी मुंबई) येथील अत्याधुनिक व मोफत उपचारांसाठी आवश्यक असलेली प्राथमिक तपासणी, कागदपत्रांची पूर्तता आणि रुग्णांचे मार्गदर्शन आता भूममध्येच उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मल्हार पाटील यांनी भूम तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देत कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तसेच उपस्थित नागरिकांमध्ये मल्हार पाटील यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे आगामी काळात ते “भावी खासदार“ म्हणून उदयास येतील, अशी चर्चा होत असल्याचेही कार्यक्रमस्थळी ऐकायला मिळाले.
तेरणा हॉस्पिटल, नेरुळ येथे धाराशिव जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांवर अत्याधुनिक व पूर्णतः मोफत उपचार केले जात असून, अनेक रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे. मात्र, प्राथमिक तपासणी व कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी धाराशिव येथे जावे लागत असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी भूम येथे तेरणा जनसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना प्राथमिक तपासणी, आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता तसेच तेरणा हॉस्पिटलशी थेट समन्वयाची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, हे केंद्र गरजूंसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सभापती विश्वास कोकणे, विधानसभा 243 मतदारसंघ प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, महादेव वडेकर, अंगद मुरूमकर, प्रदीप साठे, स्वातीताई तनपुरे, बाबासाहेब वीर, शंकर खामकर, बिभीषण पवार, सिद्धार्थ जाधव, सुदाम पाटील, सुभाष पांढरे, सुहास सानप, ज्ञानेश्वर सानप, सुब्राव शिंदे, अमोल डोबाळे, गणेश भोगील, अशोक महानवर, पवन वणवे, रोहिदास भोसले, सुरेश उपरे, निलेश शेळके, बन्सी काळे, बालाजी भोरे, संजय जगदाळे, हनुमंत शेलार, प्रभाकर डोबाळे, अशोक पाटील, रंजित वारे, सुहास चव्हाण, काकासाहेब चव्हाण यांच्यासह तेरणा जनसेवा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तेरणा जनसेवा केंद्र हे केवळ कार्यालय नसून, गरजू रुग्णांसाठी विश्वासाचे आरोग्यसेवा केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
