भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया महिनाभरापासून रखडल्याने शहरातील कचरा संकलन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे नगरपरिषद प्रशासनासह सत्ताधारी आलम प्रभू शहर विकास आघाडी आणि जनशक्ती शहर विकास आघाडीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन बराच कालावधी उलटूनही घनकचरा व्यवस्थापनाची निविदा अंतिम करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून दहा प्रभागांतील मोकळ्या जागा तात्पुरत्या कचरा डेपोमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या कचऱ्यातून तीव्र दुर्गंधी पसरत असून डास, माश्या व इतर रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विधान परिषदेच्या आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतरही नगरपरिषदेकडून विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासारख्या अत्यावश्यक विषयावर कोणताही निर्णय होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील मूलभूत नागरी सुविधांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.
घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच पाणीपुरवठा, पथदिवे, स्ट्रीट लाईट आदी अत्यावश्यक सेवांबाबतही कोणतेही ठोस नियोजन किंवा निर्णय होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या प्रश्नांवर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरपरिषद प्रशासनाने मौन बाळगल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नात होत असलेला विलंब हा केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून जनतेच्या आरोग्याशी खेळ असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने विशेष सभा घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. शहरातील कचरा त्वरित उचलावा आणि मूलभूत नागरी सुविधा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
नगरसेवक चंद्रमणी गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता नागरिकांना नगराध्यक्ष यांनी वेठीस धरण्याचे धोरण अवलंबले असून अधिकार असताना त्यांनी जबाबदारी झटकली त्यामुळे जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जबाबदारी घेउन स्वछतेसाठी स्वखर्चाने ट्रॅकटर सुरु करून आपल्या प्रभागातील महिला वर्गाला दिलासा देण्याचे काम केले.
तसेच जन शक्ती नगर विकास आघाडीचे गटनेते रुपेश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली की घनकचरा व्यवस्थापन मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी यांना केली आहे.त्याचा राग मनात ठेऊन नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला त्याला आम्ही नगरसेवकांनी स्व खर्चातुन कचरा संकलन करून उत्तर दिले आहे. नागरिकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि भ्रष्टाचारा विरुद्ध लढाई थांबणार नाही असे सांगितले.
भूम शहरातील पारडी रोडवरील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोर नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे .सदरील कचरा नगरपालिका व्यवस्थापनाने उचलावा अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमोले यांनी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन केली आहे.
