भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर संपल्याने, तसेच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होऊन आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्वसाधारण सभा घेता आली नाही. परिणामी शहरातील घंटागाड्या व नाली सफाईचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते.

या पार्श्वभूमीवर जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी मजूर नेमून स्वच्छता व्यवस्था सुरू ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागितले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले, परंतु त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

अखेर जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या-आपल्या प्रभागात स्वखर्चाने तीन ट्रॅक्टर लावून कचरा संकलन सुरू केले. लक्ष्मी नगर, गालिब नगर, निखिल नगर, एस. पी. कॉलेज परिसर, वडार गल्ली, भीमनगर, साठेनगर, बागवान गल्ली, कोष्टी गल्ली, समर्थनगर, शिवाजीनगर, शाळू गल्ली, गराडा गल्ली, वीर गल्ली, विजयनगर आणि गांधी चौक या भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमामुळे नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, विशेषतः महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभागात नियमितपणे ट्रॅक्टर फिरत असल्याने स्वच्छतेची व्यवस्था सुधारल्याचे नागरिकांनी सांगितले.

नगरसेवकांनी स्वखर्चाने सुरू केलेल्या या स्वच्छता मोहिमेचे नागरिकांनी आणि महिला वर्गाने स्वागत केले आहे. नगराध्यक्षांनी जबाबदारी झटकली असली तरी “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या भूमिकेतून नगरसेवकांनी कार्य करून दाखवले, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.


 
Top