तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील साठे नगर परिसरात खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम 2025-26 अंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामातील त्रुटींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नियमानुसार मुरूम न भरल्याने मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता सध्या धोकादायक बनल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साठे चौक ते दत्ता पारधे यांच्या घरापर्यंत सार्वजनिक जागेवर सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला मुरूम भरून समतल करणे आवश्यक असताना ते करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे निर्माण झाले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने या खड्ड्यांमध्ये कचरा पावसाचे व सांडपाण्याचे पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून गावात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरूम भरून खड्डे बुजवावेत, पाणी साचण्याची समस्या दूर करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसह आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी काटगाव ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
