कळंब, (प्रतिनिधी)- ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच संस्थापक शिक्षणमहर्षी शि. म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित “अखंड अन्नदान सेवारत्न पुरस्कार वितरण सोहळा” मंगळवार, दि. 21 जुलै 2026 रोजी शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथील पंढरीनाथ बारकुल सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर हे होते. प्राचार्य डॉ. हेमंत भगवान प्रमुख उपस्थित होते, तर मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब पंढरीनाथ बारकुल यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात पंढरपूर आषाढी वारीमध्ये सन 1946 पासून अखंड अन्नदानाची सेवा करणारे ह.भ.प. श्री. बंडोपंत नरहर दशरथ व परिवार, कळंब यांना “अखंड अन्नदान सेवारत्न पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. तब्बल आठ दशकांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेल्या या सेवाकार्याचा उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख करत कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना ह.भ.प. बंडोपंत नरहर दशरथ म्हणाले, “मराठवाडा, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीसाठी येतात. एकूण 54 दिंड्यांतील सरासरी नऊ ते दहा हजार वारकऱ्यांना 1946 पासून अन्नदानाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. अन्नदान हीच श्रेष्ठदानाची परंपरा असून, यातच पांडुरंगाचे खरे दर्शन घडते. या सेवेमुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. चांदूरबाजार, धाराशिव, गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान, डिकसळ, तालुका पत्रकार संघ यांच्याप्रमाणेच ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या शैक्षणिक संस्थेनेही माझ्या सेवाकार्याची दखल घेत ‌‘अखंड अन्नदान सेवारत्न पुरस्कार' प्रदान केला, याचा मला विशेष आनंद आहे.”

अध्यक्षीय समारोपात डॉ. अशोकराव मोहेकर म्हणाले, ”‌‘ज्ञान दीप लावू जगी' हे ब्रीद घेऊन शिक्षणमहर्षी शि. म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना केली. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हे संस्थेचे कर्तव्य आहे. दशरथ परिवाराची अन्नदान सेवा ही समाजासाठी प्रेरणादायी असून, गेल्या 45 वर्षांपासून या सेवेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याची संधी संस्थेला लाभली, याचा आम्हाला अभिमान आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय मिटकरी यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. दादाराव गुंडरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. संजय कांबळे, सहसचिव भागवतराव गव्हाणे, सुरेश टेकाळे, संचालिका प्रा. अंजलीताई मोहेकर तसेच दशरथ परिवारातील सदस्य उपस्थित होते. या सोहळ्यास ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षण, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. कमलाकर जाधव, जयंत भोसले, प्रबंधक हनुमंत जाधव, अधीक्षक अरविंद जाधव व संदीप सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top