भूम (प्रतिनिधी)-  बाणगंगा साखर कारखान्याकडे (आयन मल्टी ट्रेड एल.एल.पी.) ऊस पुरवठा करूनही सहा ते सात महिन्यांपासून थकीत बिले न मिळाल्याने संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवार (दि. 21) पासून कारखाना परिसरात शेतकरी प्रतिनिधी गणेश अंधारे महाराज यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. थकीत ऊसबिलांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त तसेच कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कारखान्याला ऊस पुरवून अनेक महिने उलटून गेले असले तरी त्यांच्या खात्यावर बिलांची रक्कम जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांची ऊसबिले वर्षभरापासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक भांडवल, कर्जाचे हप्ते, खत-बियाणे, मजुरी तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यापूर्वी 2 जुलै रोजी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते. त्या वेळी कारखाना प्रशासनाने 20 जुलैपूर्वी सर्व थकीत ऊसबिले अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने प्रशासनावरील विश्वास उडाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे अखेर 21 जुलैपासून अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

 
Top