धाराशिव (प्रतिनिधी)- मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक व हीन पातळीची टिप्पणी करणाऱ्या कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील नाजिया इलाही खान हिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुस्लिम बांधवांच्या वतीने बुधवारी (दि. 1) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोलकाता येथील नाजिया इलाही खान हिने मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीची व अवमानकारक टिप्पणी केली आहे. त्यामुळे तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. नाजिया इलाही खान ही सोशल मीडियावर नेहमीच वादग्रस्त विधाने करीत असते. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तिचेवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर मसूद शेख, धनंजय शिंगाडे, खलील सय्यद, बाबा मुजावर, आयाज शेख, खैराती मुजावर, एजाज काझी, महेबुबपाशा पटेल, शौकत मुजावर, इफ्तेखार सय्यद, अल्ताफ शेख,ॲड. परवेज काझी, ॲड.जावेद काझी, ॲड.इम्रान मुजावर, अजहर पठाण यांच्यासह मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.
